पोक्रा प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालनाचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हयातील नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प राबविला जात असून सदर प्रकल्पामध्ये जळगाव जिल्ह्यातील 460 गावांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, पोक्रा प्रकल्पांतर्गत मधुमक्षिका पालनाचा लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. 

या प्रकल्पामध्ये मधुमक्षिका पालन ही वैयक्तिक लाभाची बाब देय केली जात आहे. पिकांचे उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन हा पुरक जोड व्यवसाय असतो मधमाशांपासून मध, मेण यासारखे उत्पादने मिळतात तसेच फुलातील मध गोळा करता करता अप्रत्यक्षपणे परागीकरणाचे मोठे कार्य करतात. यामुळे जवळजवळ 30 टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते. मधुमक्षिकापालन पालनाव्दारे दुहेरी फायदा मिळावा म्हणून नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पामार्फत या घटकांमार्फत या घटकांकरीता अर्थसहाय्य देय आहे. 

या योजनेअंतर्गत भूमीहीन व्यक्ती, अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने यांना लाभ देण्यात येतो. योजनेचा लाभ भूमीहीन व 5 हे. पर्यंत क्षेत्र असलेल्या भूधारकास घेता येतो. लाभार्थ्याने सदरचा व्यवसाय हा किमान 3 वर्ष करणे आवश्यक आहे.व ज्या  शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. अशा शेतकऱ्यांना मधुमक्षिका संचाचे वाटप प्राधान्याने करण्यात येते. महिला शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येते. या घटकांतर्गत एका लाभार्थ्यास कमाल 50 मधुमक्षिका संचाच्या मर्यादेत 75 टक्के प्रमाणे अर्थसहाय्य भूमीहील व अल्प व अत्यल्प भूधारकांना देय असून 2 हे. ते 5 हे. पावेतो भूधारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना 65 टक्के अर्थसहाय्य लाभ देय राहील.

तरी जास्तीजास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा  संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. अधिक माहिती करीता समुह सहाय्यक, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

Protected Content