महामार्गावर अजून एकाचा बळी; बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचे तांडव थांबता थांबत नसून खोटेनगरच्या पुढील व्दारकानगर स्टॉपजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश सुरेश पाटील (वय ४७, रा. द्वारका नगर, स्वामी समर्थ कॉलनी) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश पाटील हे मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी आपले साडू गणेश दिलीप पाटील यांच्यासोबत बिबानगर भागात प्लॉट पाहण्यासाठी गेले होते. त्यांचे साडू हे दुसऱ्या दुचाकीवर तर महेश पाटील हे आपल्या (एम.एच.१९, डी.जे.१४०५) या दुचाकीवर होते. प्लॉट पाहून झाल्यानंतर ते दुपारी ४ वाजता महामार्गालगतच्या व्दारकानगर स्टॉपजवळून घराकडे वळत असतानाच समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या बसने (एम.एच.४०, एन.९८३८) दिलेल्या जोरदार धडकेत दुर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचे साडू गणेश पाटील यांच्या फिर्यादीवर बसचालकाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास अनिल फेगडे यांनी केला. पुढील तपास लिलाधर महाजन हे करत आहेत.

महेश पाटील हे सुप्रीम कंपनीत कामाला होते. १५ ऑगस्टनिमित्त सुट्टी असल्याने ते त्यांच्या साडूसोबत प्लॉट पहायला गेले होते. मात्र, घरी परतत असतानाच त्यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी माधुरी पाटील, ११ वर्षाचा मुलगा जय व १४ वर्षांची मुलगी श्रध्दा असा परिवार आहे.

Protected Content