यावल बस स्थानकात पुन्हा चोरी : महिलेच्या बॅगेतून सोन्याची साखळी लंपास

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल बस स्थानक परिसरात प्रवासी महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असून, निरूळ (ता. रावेर) येथील एका महिलेच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सोन्याची साखळी लंपास केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. मंगला नारायण पाटील (वय 62, रा. निरूळ, ता. रावेर) या 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजता यावल बस स्थानकातून रावेर जाणाऱ्या बस (क्रमांक MH-20 BL-1774) मध्ये प्रवास करत होत्या. बस फैजपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ आली असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून 98,000 रुपये किमतीची 24 ग्रॅमची सोन्याची साखळी, 150 रुपये रोख रक्कम आणि आधार कार्ड चोरले.

यावल बस स्थानकात महिलांच्या दागिन्यांची चोरी वारंवार होत असल्याने प्रवासी महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांची बाजारातील किंमत दोन लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. बस स्थानक परिसरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, प्रवाशांनीही आपली मौल्यवान संपत्ती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content