मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या मागे दुसरीच ताकद असल्याची शंका माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकताच विधानपरिषद निवडणुकीत विजय संपादन केला आहे. अर्थात, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच दुसरे एकनाथ म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारला जोरदार हादरा देऊन आपल्या समर्थकांना सोबत घेऊन शिवसेनेत उभी फूट पाडली. खडसे यांच्या समर्थकांना त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची अपेक्षा असतांना हा सर्व प्रकार घडल्याचा विलक्षण योगायोग यातून दिसून आला आहे.
दरम्यान, या प्रकारावर आ. एकनाथराव खडसे यांनी पहिल्यांदा आपण वेट अँड वॉच या भूमिकेत असल्याचे मुक्ताईनगरात पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते. यानंतर ते मुंबईला निघून गेले होते. दरम्यान, रविवारी कल्याण येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आयोजीत सत्कार कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे दुसरीच शक्ती असल्याचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, कुणी तरी ताकद दिल्याशिवाय शिंदे इतके मोठे पाऊल उचलणार नाही. भविष्यात यामागे कोण आहे हे समोर येईलच असे विधान देखील त्यांनी याप्रसंगी केले.