केजरीवाल विरोधी आंदोलनात अण्णा हजारे यांच्या सहभागाचा भाजपचा नवा डाव

अहमदनगर वृत्तसंस्था । एकेकाळी अण्णा हजारेंचे शिष्य म्हणविल्या जाणाऱ्या केजरीवालांवर हजारे यांनी अनेकदा टीका केली. मात्र, त्यांच्या विरोधात ठोस कृती केलेली नाही आणि लोकही त्यांचे जुने संबंध विसरायला तयार नाहीत. आता दिल्लीतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी हजारे यांना पत्र पाठवून केजरीवाल विरोधातील जनआंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

गुप्ता यांनी पाठविलेले पत्र अद्याप राळेगणसिद्धी येथील कार्यालयात प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हजारे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहीही भूमिका घेतली तरी दोन्ही बाजूंनी पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

पत्रात हजारे यांना दिल्लीत सध्या भाजपतर्फे सुरू असलेल्या आम आदमी पार्टी सरकारविरोधातील जनआंदोलनात सहभागी होण्याची विनंती गुप्ता यांनी केली आहे. पत्रात गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर विविध आरोप केले आहेत. केजरीवाल सरकार हे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भ्रष्टाचाराचे नवे नाव आहे. या सरकारने गलिच्छ राजकारणाची परिसीमा ओलांडली आहे. स्वच्छ आणि निष्पक्ष राजकारणाच्या नावाखाली सरकारमध्ये आलेल्या आम आदमी पक्षाने राजकीय शुद्धतेचे सर्व मापदंड पायदळी तुडवले आहेत.

दिल्लीतील दंगलीचे नियोजन केल्याचा आरोपही गुप्ता यांनी आम आदमी पार्टीवर केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरुद्ध सतत लढा देत आहोत. आपण दिल्लीत येऊन भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा आणि आमच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा. केजरीवाल सरकारने विश्वासघात केल्याचे वाटत असलेल्या तरुणांना आणि दिल्लीतील लोकांची यापासून सुटका करण्यासाठी आपण पुन्हा आंदोलन उभे केले पाहिजे, असेही गुप्ता यांनी पत्रात म्हटले आहे.

२०११ मध्ये हजारे यांच्या नेतृत्वाखाली लोकपाल कायद्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन झाले होते. दिल्लीतील रामलीला मैदानावरून अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीत अनेक नवे कार्यकर्ते जोडले गेले होते. आंदोलनानंतर चळवळीत राहून काम करायचे की राजकारणात प्रवेश करून यंत्रणा सुधारायची, असे मतप्रवाह निर्माण झाले होते.

केजरीवाल यांनी दुसरा पर्याय निवडला आणि आम आदमी पार्टीची स्थापना केली. त्यांनी तिसऱ्यांदा दिल्लीत सत्ता मिळविली. सुरुवातीला केजरीवाल हे हजारे यांचे शिष्य मानले गेले होते. मात्र, त्यांनी हजारे यांचा विरोध डावलून राजकारणात प्रवेश केल्याने दुरावा निर्माण झाला.

मात्र, हळूहळू हजारे यांनी केजरीवाल यांच्या कार्यावर टीका करण्यास सुरवात केली. त्यानंतर दोघांतील संबंध अधिकच ताणले गेले. अलीकडच्या काळात त्यांच्यात कोणताही संपर्क नसल्याचे सांगण्यात येते. तरीही अनेक दिवस केजरीवाल यांना हजारे यांचे शिष्य संबोधून त्यांच्या सरकारच्या कारभारासंबंधी हजारे यांना भूमिका विचारली जात होती. अशा परिस्थितीत भाजपने केजरीवाल यांच्याविरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण हजारे यांना दिले असल्याचे त्यावर हजारे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Protected Content