राज्यात बोनस शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणाची ईडीकडून दखल

crime

नागपूर प्रतिनिधी । राज्यातील कॉलेजेसने बोगस विद्यार्थी प्रवेशाच्या आधारे राज्य व केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती लाटली. त्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. परंतु, गेल्या दोन वर्षांत याप्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता सक्तवसुली संचालनालयने (ईडी) या घोटाळ्याची दखल घेऊन चौकशी करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

ईडीने मनिलॉंडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कॉलेजेसवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. ईडीचे सहायक संचालक गोपाल गाडे यांनी सामाज कल्याण विभागाकडून कॉलेजेसला देण्यात आलेल्या शिष्यवृत्तीची माहिती मागितली आहे. कॉलेजेसने बोगस विद्यार्थी प्रवेश दाखवून शिष्यवृत्तीचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ लाटला असल्याचा दावा करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश कॉलेजेस हे राजकीय नेत्यांची आहेत. राजकीय नेत्यांनी समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा केल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, एसआयटीने २०१० ते २०१७ या कालावधीतील जिल्हानिहाय कॉलेजेसमध्ये देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती वाटपाची चौकशी केली होती. त्यात नर्सिंग, व्होकेशनल, टेक्निकल आणि दुरस्थ शिक्षण पद्धतीच्या कोर्सेसचा समावेश होता. त्यामुळे ईडीने आता त्या सात वर्षात किती प्रवेश झालेत, किती विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची मागणी केली, तसेच किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली, त्याची माहिती मागितली आहे. सदर माहितीचे विश्लेषण केल्यानंतर ईडीकडून येत्या काळात थेट मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Protected Content