अनिल परबांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी अटळ – सोमय्या

सिंधूदुर्ग | परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर दिवाणी आणि फौजदारी गुन्हे दाखल होणार असून त्यांची मंत्रीमंडळातील हकालपट्टी अटळ असल्याचे प्रतिपादन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले. ते येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या आज सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिंडळातील मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनार्‍यावर दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. त्याची चौकशी झाली आहे. त्यावर कारवाई करण्याचा निर्णय झाला आहे. त्यातील एका रिसोर्टचं नाव साई रिसोर्ट ऍनेक्स असं आहे. तर दुसर्‍याचं नाव सी-कॉन्च रिसोर्ट असं असून हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा असल्याचं लपवण्याचा परब यांचा प्रयत्न आहे. हे दोन्ही रिसोर्ट अनधिकृत असल्याचं केंद्राच्या टीमने राज्य सरकारने सांगितलं होतं. दोन्ही रिसोर्टमध्ये सीआरझेडचा भंग झाला आहे. पण सरकारने केवळ साई रिसोर्ट तोडण्याचा आदेश दिला आहे. दुसरा रिसोर्ट वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. पण आम्ही या रिसोर्टवर कारवाई करायला लावूच, असा इशारा याप्रसंगी किरीट सोमय्या यांनी दिला. 

सोमय्या पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळातील मंत्रीच अनधिकृत बांधकाम करत आहे. सचिव रिसॉर्ट अनधिकृत घोषित करतात. तरीही उद्धव ठाकरे परब यांना मंत्री म्हणून कायम ठेवतात. परब यांची हकालपट्टी तर होणारच. पण त्यांच्याविरोधात फौजदारी आणि सिव्हील कारवाई करावी लागणार. हे काम भाजप करणार आहे. परब यांनी ११ ते १२ कोटींची बेनामी संपत्ती जमवली आहे. सचिन वाझेकडून आलेले हप्ते याकडे वळविले आहे. याची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. जून २०२१मध्ये लोकायुक्तांना राज्यपालांनी आदेश दिले. तसेच अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या साई रिसोर्टची लोकायुक्तात सुनावणी सुरू झाली आहे. पहिल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने पाच पानी अहवाल दिला. त्यात त्यांनी रिसोर्ट अनधिकृत असल्याचं म्हटलं आहे. मालकांना नोटीस दिल्या आहेत. रिसोर्ट आणि मालकांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. पण ते मंत्री असल्याने कारवाई होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तर अनिल परब यांचे मंत्रीपद जाणे अटळ असल्याचा दावा देखील त्यांनी केला.

 

Protected Content