पहूर, ता.जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित झाल्याने येथील शेतकरी एमएसईबी कार्यालयालत निवेदन देण्यासाठी गेले असता एमएसईबी कार्यालयात संबंधित अधिकारी अनुपस्थित होते. जवळपास तब्बल दोन तास वाट पाहूनही अधिकारी न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कार्यालयास कुलूप ठोकले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “दिनांक ११ मार्च रोजी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस व सूचना न देता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. दरम्यान रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून पिके परिपक्व होत आहेत. पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. गेल्या महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी वीज बिल भरलेले असतानासुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यातल्या त्यात हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम वीज पुरवठा खंडित झाल्याने हातातून निघून जातो की काय? अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असून तरी खंडित केलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली जात आहे.
संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी एमएसईबी कार्यालयाला कुलूप ठोकले. नंतर बसस्थानक परिसरात रास्ता रोको करण्यात आला होता. “ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा कनेक्शन बंद केली जात आहे सध्या कोरणामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खूप गंभीर असून कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होत नाही. शासनाकडून यासंदर्भात कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. असे अचानक पाणी पुरवठा कनेक्शन बंद केल्यास गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होईल. शेतकर्यायांना यावेळी व ग्रामपंचायतींना विज बील भरण्यासाठी मुदत द्यावी व विज कनेक्शन कट करण्यात येऊ नये.” असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, सरपंचपती रामेश्वर पाटील, सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, अब्बु तडवी, ईश्वर देशमुख, संजय पाटील, वासुदेव घोंगडे, ललित लोढा, योगेश भडांगे, दिनकर पवार, सुदाम लहासे यांच्यासह असंख्य शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.