उपेक्षित क्रांतिकारकांचे स्मारक संतप्त कार्यकर्त्यांनी उघडले ! राजकीय अनास्थेचा निषेध

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील स्वातंत्र्य संग्राम सेनानी डॉ. उत्तमराव पाटील आणि क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांच्या स्मारकासाठी जनतेला आणखी प्रतीक्षा करावी लागली नाही. राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या प्रतीक्षेत गेल्या दीड-दोन वर्षांपासून झाकून ठेवलेले हे स्मारक अखेर संतप्त समाजसेवकांनी उघडले. कार्यकर्त्यांनी पुतळे स्वच्छ करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.

अमळनेरचा स्वातंत्र्य लढ्यात मोठा इतिहास आहे. १९४२ च्या आंदोलनात देशातील सर्वात मोठी जाळपोळ याच शहरात झाली होती आणि सर्वाधिक दंडही इंग्रजांनी अमळनेरला ठोठावला होता. या आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ क्रांतिवीर डॉ. उत्तमराव पाटील आणि क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील हे होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ‘पत्री सरकार’मध्ये लीलाताई महिला ब्रिगेडच्या प्रमुख होत्या, तर चिमठाण्याजवळचा खजिना लुटण्यात डॉ. उत्तमराव पाटील यांचा सक्रिय सहभाग होता. अमळनेर तालुक्यातील डांगरी हे या क्रांतिकारी दाम्पत्याचे मूळ गाव. त्यांच्या स्मरणार्थ ढेकू रोडवर हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे, जे अमळनेरच्या क्रांती पर्वाचे प्रतीक आहे.

परंतु, राजकीय व्यक्तीच्या हस्तेच उद्घाटन व्हावे या अनाकलनीय भूमिकेमुळे या स्मारकातील पुतळे गेल्या अनेक महिन्यांपासून कापडात झाकून ठेवण्यात आले होते. जणू काही क्रांतिकारकांची मुस्कटदाबी केली जात होती, असा संतप्त भाव कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला होता. हा एकप्रकारे या थोर क्रांतिकारकांचा अवमान होता, असे मानून अखेर सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी स्मारकाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडले आणि झाकलेले पुतळे जनतेसाठी खुले केले. कार्यकर्त्यांनी पुतळे पाण्याने स्वच्छ केले आणि त्यांना पुष्पहार अर्पण करून डॉ. उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांना आदराने अभिवादन केले.

या स्मारकाला जनतेसाठी खुले करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्यासह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष शरदराव पाटील, गोकुळ बागुल, गोकुळ पाटील, शालिग्राम पाटील, हिम्मतराव, अँड. अशोक बाविस्कर, मोतीलाल जाधव, दीपक सोनवणे, रोहिदास गुरुजी, जयेश म्हासरे आणि डी. के. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

याप्रसंगी बोलताना संदीप घोरपडे म्हणाले, “१ मे रोजी क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने २६ एप्रिल रोजी अमळनेर ते डांगरी पदयात्रा काढण्यात येणार आहे. अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या या थोर क्रांतिकारकांचे पुतळे धूळ खात पडून राहावे आणि कपड्यात झाकून ठेवावेत, हे जनतेला सहन होत नव्हते. म्हणूनच आम्ही हे स्मारक उघडण्याचा निर्णय घेतला.” कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे राजकीय अनास्थेवर थेट बोट ठेवण्यात आले असून, आता तरी प्रशासनाकडून या स्मारकाचे योग्य सन्मानाने लोकार्पण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Protected Content