यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील विकास कामांचे निरीक्षण करण्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावल येथील कार्यालयात येत नसल्याने कोट्यवधीची अनेक विकासकामे ही जळगाव येथूनच हाताळली जात असल्याची ओरड नेहमीच संबंधित नागरिकांकडुन करण्यात येत असते. या विषयाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.
यावल तालुका हा आदिवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो, तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातुन अतिमहत्वाचे असलेले शेळगाव बॅरेज, वेगाने प्रगतीपथावर असलेले यावलच्या तहसील इमारतीचे निर्माण कार्य, याशिवाय विविध रस्त्यांचे नुतनीकरण अशी कोटयावधी रुपयांची कामे तालुक्यात सुरू आहेत. या सर्व विकासकामांचे निरीक्षण करण्याची जबाबदारी यावल येथे नेमणुकीस असलेले उपाविभागीय अधिकारी व अभियंता यांची आहे. असे असतांना एकही आधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासस्थान असतांनाही उपस्थित राहात नसल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित अधिकारी यांनी मुख्यालय सोडु नये, असे शासनाचे आदेश असतांनाही त्याचे पालन होत नसल्याने कोटयवधी रुपयांच्या विकास कामावर कुणाचे नियंत्रण नसल्याचे चित्र तालुक्यात सध्या दिसुन येत आहे. यामुळे सर्व विकास कामांच्या गुणवतेबद्दल नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वारिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात यावल येथे नेमणुकीस असलेल्या अधिकारी वर्गास मुख्यालय सोडून इतरत्र राहु नये व मुख्यालय सोडुन जावु नये असे आदेश द्यावे, अशी अपेक्षा तालुकावासी करीत आहेत.