मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या भोंग्यांवरून राज्यात वातावरण तापलेले असतांना राज्याच्या गृह विभागाने अनधिकृत भोंग्यांवर कारवाईची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरण्यासाठी इशारा दिलेला असतांनाच आता गृह खाते अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक हे सर्व जिल्हा प्रमुख पोलीस अधिकार्यांची लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत भोंगा आणि लाऊड स्पीकर संदर्भातील काही निर्णय घेण्यात येणार असून सध्या सर्व मार्गदर्शक सूचनाचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यभर भोंग्यांवरून राजकारण तापलं असताना नाशिकमध्ये पोलिस आयुक्तांनी सर्व भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता राज्याच्या गृहखात्यानेही या प्रकरणावर ठोस पावलं उचलली आहेत. त्यामुळे सर्व धर्मियांना भोंगा किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य असणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.