हिंदुस्तानी भाऊला आता पुन्हा पोलिसांची नोटीस

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपातून कालच जामीन मिळालेला विकास पाठक उर्फ हिंदूस्तानी भाऊ याला आता नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली असून यामुळे त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नागपूर पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ याला नोटीस बजावली असून २२ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांना चिथावणी देत आंदोलन घडवून आणल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याने ३० जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगितला. एवढंच नाहीतर वेळ आणि किती वाजेपर्यंत आंदोलन करायचे याची सूचना सुद्धा केली होती.

राज्यातील महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. पण, या निर्णयाच्या विरोधात नागपूर, मुंबई, पुणे आणि बीडमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरच विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संशय व्यक्त केला असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

हिंदूस्तानी भाऊ हा कालच जामीनावर सुटला असतांना आता त्याला नव्याने नोटीस बजावण्यात आल्यामुळे आता त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

Protected Content