आनंदाची शिधा योजना बंद; रेशनकार्डधारकांना धक्का

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ या लोकप्रिय योजनेला आता पूर्णविराम मिळाला आहे. या निर्णयाने राज्यभरात चर्चा सुरू झाली असून, या योजनेचा लाभ घेत असलेल्या १ कोटी ६३ लाख लाभार्थ्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

‘आनंदाचा शिधा’ योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात २०२२ साली दिवाळीदरम्यान सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत केशरी रेशनकार्डधारकांना अवघ्या १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, १ किलो चणा डाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल देण्यात येत होते. २०२३ मध्ये गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळी अशा प्रमुख सणांच्या काळातही लाभार्थ्यांना हा शिधा वितरित करण्यात आला होता. दर वेळी सरकारने या योजनेसाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च केले होते.

मात्र, आता राज्य सरकारने आर्थिक स्थितीचा विचार करून ही योजना पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याची वित्तीय तूट दोन लाख कोटींच्या पुढे गेली असून ती सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाच्या (GSDP) ३% इतकी आहे. यामुळे काही कल्याणकारी योजना बंद करण्याचा सरकार विचार करत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेली ‘शिवभोजन थाळी’ आणि एकनाथ शिंदे सरकारच्या ‘आनंदाचा शिधा’ या योजना बंद करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली होती. येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ‘शिवभोजन थाळी’ योजना बंद करू नये, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीच्या काळात, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामुळे सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वसामान्य नागरिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Protected Content