जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्हिडिओला लाईक व शेअर करण्यासाठी मोबदला देण्याचे अमिष दाखवत राहुल भागवत सोनवणे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) या तरुणाची ११ लाख ४३ हजार ९९९ रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी गुरुवार, ६ जून रोजी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील रहिवासी असलेला राहुल सोनवणे हा शिक्षण घेत आहे. ३१ मे ते ५ जून या दरम्यान मोबाईलवरून व टेलिग्रामवरून त्याच्याशी एका जणाने संपर्क साधला. यात त्याला ऑनलाईन टास्क देत व्हिडिओ लाईक व शेअर केल्यास एका व्हिडिओसाठी १२३ रुपये देण्याचे अमिष दाखवले. या सोबतच वेगवेगळे टास्क देऊन अधिक पैसे गुंतवल्यास जास्त प्रमाणात नफा होईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार गुंतवणूक केली मात्र नफा तर दूरच, मुद्दलही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले.