मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान होणाऱ्या महिलांच्या मृत्यूबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जगात दर २ मिनिटांनी एका महिलेला आपला जीव गमवावा लागतो, हे वास्तव अत्यंत चिंताजनक आहे. २०२३ मध्ये भारतामध्ये सुमारे १९ हजार गर्भवती महिलांचा मृत्यू झाला. म्हणजे दररोज सरासरी ५२ महिला गर्भधारणा किंवा प्रसूतीशी संबंधित गुंतागुंतींमुळे मृत्युमुखी पडतात. जागतिक मृत्यू टक्केवारीच्या तुलनेत ७.२% मृत्यू भारतात होतात, ज्यामुळे भारत नायजेरियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अहवालानुसार, नायजेरियात ७५,००० मृत्यू झाले असून ही संख्या जागतिक एकूण मृत्यूंपैकी २८.७% आहे. दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये ११ हजार मृत्यू नोंदवले गेले आहेत, म्हणजेच दररोज सरासरी ३० महिला आपले प्राण गमावत आहेत. एक सकारात्मक बाब म्हणजे, २००० ते २०२३ या कालावधीत भारतात माता मृत्युदरात ७८% घट झाली आहे. ही सुधारणा आरोग्य सेवा आणि सुविधा सुधारण्याच्या दिशेने झालेल्या प्रयत्नांचे फलित असल्याचे मानले जात आहे. WHO च्या अंदाजानुसार, २००० पासून जागतिक पातळीवर मातामृत्यू दरात ४०% घट झाली आहे. मात्र, २०१६ पासून या सुधारणेचा वेग मंदावला आहे, हेही या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयसस म्हणतात, “या आकडेवारीतून स्पष्ट होते की गर्भवती महिलांसाठी आरोग्य सेवा अजूनही अपुरी आहे. जर पायाभूत आरोग्य सुविधा तातडीने आणि प्रभावीपणे सुधारण्या गेल्या नाहीत, तर ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते.”
या अहवालातून जागतिक स्तरावर आणि विशेषतः भारतात मातामृत्यू दराशी संबंधित असलेल्या यंत्रणांना सजग होण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, वेळेत वैद्यकीय मदत आणि जागरूकता वाढवणे हे आता अधिक गतीने आणि व्यापकपणे हाती घेणे अत्यावश्यक बनले आहे.