मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. या वर्षी त्यांनी १२० कोटी रुपयांचा कर भरला असून, यामध्ये त्यांनी १५ मार्च २०२५ रोजी ५२.५ कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता जमा केला आहे. कर भरण्याच्या बाबतीत बिग बी यांनी अभिनेता शाहरुख खानला मागे टाकले आहे, ज्याने या वर्षी ८४.१७ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला.
या वर्षी अमिताभ बच्चन यांची एकूण कमाई ३५० कोटी रुपये झाली आहे. ही रक्कम त्यांनी चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि लोकप्रिय टीव्ही शो कौन बनेगा करोडपतीच्या होस्टिंगद्वारे कमावली आहे. गेल्या दोन दशकांपासून ते या शोचे यजमान आहेत. गेल्या वर्षी (२०२३-२४) त्यांनी ७१ कोटी रुपये कर भरला होता, तर या वर्षी त्यांनी कराच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. दुसरीकडे, शाहरुख खानने गेल्या वर्षी ९२ कोटी रुपये कर भरून सर्वाधिक करदात्याचा मान मिळवला होता. यंदा सलमान खानने ७५ कोटी रुपये तर दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजयने ८० कोटी रुपये कर भरला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२४ नुसार, अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती १,६०० कोटी रुपये आहे. त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत चित्रपट, कौन बनेगा करोडपती (५-८ कोटी रुपये प्रति एपिसोड) आणि ब्रँड एंडोर्समेंट आहेत. याशिवाय, शेअर बाजार आणि मालमत्तेतील गुंतवणूक यांमुळेही त्यांची संपत्ती वाढत आहे.
अमिताभ यांच्याकडे मुंबईत पाच बंगले आहेत, ज्यापैकी चार बंगल्यांची नावे जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वत्स अशी आहेत. ते आपल्या कुटुंबासह जलसा बंगल्यात राहतात, ज्याची किंमत १२० कोटी रुपये आहे. हा बंगला त्यांना सत्ते पे सत्ता चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी भेट म्हणून दिला होता. दुसरा बंगला प्रतीक्षा, जिथे ते आपल्या वडिलांसोबत राहत होते, त्याची किंमत १६० कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी त्यांनी हा बंगला मुलगी श्वेता नंदा यांच्याकडे हस्तांतरित केला. जनक बंगल्यात त्यांचे कार्यालय आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील वडिलोपार्जित घराचे त्यांनी शैक्षणिक ट्रस्टमध्ये रूपांतर केले आहे. फ्रान्समध्येही त्यांची एक मालमत्ता असल्याचे मीडिया रिपोर्ट्स सांगतात.
बिग बींकडे ११ लक्झरी गाड्यांचा संग्रह आहे, ज्यात रोल्स रॉयल फॅंटम, लेक्सस, दोन बीएमडब्ल्यू आणि तीन मर्सिडीज यांचा समावेश आहे. त्यांच्या सर्व गाड्यांचा नंबर २ आहे, जो ते आपला लकी नंबर मानतात. एकलव्य चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी त्यांना पांढऱ्या रंगाची रोल्स रॉयल फॅंटम भेट दिली होती, जी ९ ते ११ कोटी रुपये किंमत असलेली त्यांच्या संग्रहातील सर्वात महागडी कार आहे. ८० च्या दशकातील अनेक स्टार्सनी आपली चमक गमावली असताना, अमिताभ बच्चन यांचा प्रभाव आणि लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांचे चित्रपट, टीव्ही शो आणि ब्रँड एंडोर्समेंटमधील योगदान त्यांना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व बनवते. २०२४-२५ मध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटीचा मान मिळवून त्यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.