बीडमध्ये अमित शहा यांना देण्यात आली ३७० तोफांची सलामी

amit shaha

बीड, वृत्तसंस्था | राज्यातील मंत्री पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (दि.८) हजेरी लावली. सकाळीच शाह यांचे औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले, तेथून हॅलेकॉप्टरने ते दसरा मेळाव्यासाठी सावरगावात दाखल झाले. काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांना बीडमध्ये ३७० तोफांची सलामी देण्यात आली.

 

पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने भगवान गडावर हा मेळावा होत असून निवडणुकीचे निमित्त साधून अमित शहा त्यासाठी आले आहेत. दसऱ्यानिमित्ताने भगवानबाबा गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भाजपची ही पहिलीच प्रचार सभा असून त्यात शाह प्रचाराचा नारळ फोडतील. सावरगावातील भगवान भक्तीगडावर मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. या ठिकाणी गर्दीचा उच्चांक मोडला जाण्याची शक्यता आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजकांकडून गृहमंत्री अमित शाह यांना ३७० कलम रद्द केल्यामुळे ३७० तोफांची सलामी देवून, ३७० तिरंग्या झेंड्यांनी त्यांचे स्वागत केले. सभास्थळी एकूण एक लाखापर्यंत भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

भगवान भक्तीगडाच्या १२ एकर मोकळ्या जागेवर दोन व्यासपीठ उभारण्यात आले आहेत. एका व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अमित शाह, राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्यासह प्रमुख मंडळी असतील. खासदार प्रीतम मुंडे यांनी नुकतेच गोपीनाथगड ते सावरगाव अशी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले आहे. पंकजा मुंडे परळीमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना धनंजय मुंडे यांचे कडवे आव्हान आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content