Home Cities जळगाव तुतारीच्या गजरात प्रभाग १९ मध्ये ‘मविआ’चा झंझावात; जल्लोषात रॅलीला सुरुवात

तुतारीच्या गजरात प्रभाग १९ मध्ये ‘मविआ’चा झंझावात; जल्लोषात रॅलीला सुरुवात

0
151

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. आज प्रभाग क्रमांक १९ मधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार संग्रामसिंह सूर्यवंशी आणि अलका राजेंद्र सपकाळ-देशमुख यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ पार पडला. रामेश्वर कॉलनी परिसरातील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळ वाढवून आणि बाप्पाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.

दिग्गज नेत्यांची मांदियाळी :
याप्रसंगी उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. निवडणूक प्रभारी तथा माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि महानगराध्यक्ष एजाज मलिक यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

शक्तीप्रदर्शनाने वेधले लक्ष :
प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर रामेश्वर कॉलनी परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि पक्षाच्या झेंड्यांनी परिसर निळा-मय झाला होता. “तुतारी” या चिन्हाचा जयघोष करत निघालेल्या या रॅलीने प्रभाग १९ मध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रॅली दरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले, तर महिलांनी औक्षण करून विजयाचा विश्वास व्यक्त केला.

विकासाचा संकल्प :
मतदारांशी संवाद साधताना संग्रामसिंह सूर्यवंशी आणि अलका सपकाळ-देशमुख यांनी प्रभागाच्या रखडलेल्या विकासाला गती देण्याचे आश्वासन दिले. मूलभूत सुविधांपासून ते सामाजिक प्रश्नांपर्यंत सर्वच आघाड्यांवर काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. प्रभाग १९ मध्ये यावेळी सत्तापरिवर्तन होणार, असा विश्वास नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. या शुभारंभामुळे आता या प्रभागात निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे.


Protected Content

Play sound