आम्ही बहुमत सिध्द करून दाखवू – चंद्रकांत पाटील

मुंबई वृत्तसंस्था । सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो, न्यायालयानुसार उद्या विधानसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी आम्ही तयार असून आम्ही बहुमत सिध्द करून दाखवू, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधून बहुमत सिद्ध करणारच असा दावा पाटील यांनी केला आहे.

गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. कोर्टाने उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस सरकारला दिला देवेंद्र फडणवीस यांना उद्या बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही, त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले. बहुमत चाचणीसाठी हंगामी अध्यक्षांची (प्रोटेम स्पीकर) नियुक्ती करा, असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.

भाजपचं संख्याबळ किती?
विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागी विजय मिळवला. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत 145 हा बहुमताचा आकडा आहे. भाजपला 6 अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या 7 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 118 वर गेलं आहे.

अजित पवारांचा पाठिंबा
अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आहेत असा दावा भाजपने केला आहे. त्यामुळे आम्ही 170 पर्यंत पोहोचू असं भाजपकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

Protected Content