राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर खासदार राऊत यांनाही शंका

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या  मनसेने नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

 नाणारमध्ये २२१  गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत का ?  खरंच कोकणाच्या हितासाठी त्यांनी ही मागणी केली आहे, याची मला कल्पना नसल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले. 

नाणार प्रकल्पासंदर्भात पुनर्विचार करावा, असे पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी ‘ राज ठाकरे यांच्या नाणारविषयी बदललेल्या भूमिकेविषयी शंका उपस्थित केली. आजही नाणारमधील अनेक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचं धाडस करावं, असे आव्हान विनायक राऊत यांनी दिले.

 नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा स्पष्ट विरोध आहे, हे दिसत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

Protected Content