मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या सभेसाठी दीड हजार रूपयांचा रेट असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात म्हणजेच पैठणमध्ये येत आहेत. त्यांच्या सभेला गर्दी जमावी म्हणून अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्यासाठी पत्र जारी करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. शिंदे गटाने हा आरोप फेटाळून लावल. यानंतर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
आमदार अंबादास दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांची १२ तारखेला संभाजीनगरला सभा आहे. या सभेला प्रतिसाद मिळणार नाही, हे माहिती असल्याने संदीपान भुमरे यांनी सरकारी कर्मचार्यांना कामाला लावलं आहे. या सभेच्या अनुषंगाने ४२ गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आले आहेत. तर, सभेला येण्यासाठी प्रति व्यक्ती दीड हजार रूपयांचा रेट देण्यात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. भुमरे यांना धडकी भरल्यामुळेच हे प्रकार करण्याची वेळ आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.