हिंगोली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंगोलीमध्ये पिवळा पाऊस पडल्याची एक आश्चर्यकारक घटना घडली असून यामुळे परिसरात भलतीच चर्चा रंगली होती. स्थानिकांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला कळवली, त्यानंतर प्रशासनाने याचा अभ्यास सुरु केला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावच्या शिवारात अचानक आकाशातून पिवळ्या रंगाचे थेंब कोसळत असल्याचे चित्र होते.
मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे पिवळ्या रंगाचे पाणी आणि थेंब कोसळत असल्याने भलत्याच चर्चांना उधाणही आले. ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली, याची गंभीर दखल घेत प्रशासनाने याचा अभ्यास करत असल्याचे सांगितले. दरम्यान, हा पिवळा पाऊस म्हणजे केमिकलयुक्त पाऊस असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कारण अशा प्रकारचा पिवळा आणि काळ्या रंगाचे पावसाचे थेंब आकाशातून पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.रंगीत पावसाचे थेंब हे प्रदुषणामुळे तयार होतात. विशिष्ट प्रदुषित हवेशी ढगांमधून पडणा-या पावसाच्या पाण्याशी संपर्क झाल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि आपल्याला अशा प्रकारे विविध रंगांमध्ये पावसाचे थेंब पडत असल्याचा भास होतो. पण प्रशासनाने हिंगोलीतील या प्रकाराचा सखोल अभ्यास केल्यानंतरच नेमका हा प्रकार काय आहे? हे स्पष्ट होणार आहे.