असुविधांमुळे अमळनेरकर त्रस्त : उद्या नगरपालिकेवर भव्य मोर्चा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून याच्या निषेधार्थ उद्या भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

अमळनेरात सध्या प्रशासक राज सुरू असून यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. यात प्रामुख्याने रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडल्याने यावरून ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. खड्डयात रस्ते आहेत की, रस्त्यात खड्डे ? असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. याच प्रमाणे शहरातील गटारींची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अद्याप देखील भुयारी गटारी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. तर अनेक ठिकाणी गटारीच नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन त्रास होत आहे.

दरम्यान, इतर अन्य देखील समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. यात प्रामुख्याने तापीला विपुल पाणी असले तरी शहरात पाण्याचा ठणठणाट आहे. नियोजन नसल्यानेच हा बट्टयाबोळ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढलेला असला तरी याकडे कुणी लक्ष देण्यास तयार नाही. तर अनेक भागांमधील पथदिवे बंद असल्याने अमळनेरकांना अंधारातूनच ये-जा करावी लागते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न देखील उपस्थित होत आहे.

अमळनेरकरांना मोठ्या प्रमाणात असुविधा होत असतांना देखील नगरपालिका प्रशासन सुस्त असून मंत्री महोदय देखील याबाबत काहीही कार्यवाही करण्यास तयार नाहीत. मूलभूत नागरी सुविधांकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. गावांत डुकरे, कुत्रे ह्यांचा सुळसुळाट आहे. उघड्यावर मास, मच्छी विकली जाते. अनेक कॉलनी मध्ये दिवाबत्ती गुल असते.

या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महा विकास आघाडी व त्रस्त नागरिक आघाडी तर्फे सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रोजी जि.प. विश्रामगृहा पासुन सकाळी ११ वाजता नगरपरिषदे वर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याठिकाणी नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजर राहावे. असे आवाहन माजी आ.डॉ. बी. एस. पाटील, नागरी समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्याम पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख सूरज परदेशी, आपचे अध्यक्ष संतोष पाटील, बीआरएस चे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केले आहे.

Protected Content