अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर पोलिसांनी दोघा मोटारसायकल चोरट्यांना अटक केली आहे.
अमळनेर शहरासह तालुक्याच्या विविध भागांमधून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना तपासासाठी स्वतंत्र पथक नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस नाईक मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, सिद्धांत सिसोदे, कॉन्स्टेबल गणेश पाटील व नीलेश मोरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता अमळनेर शहरातील ताडेपुरा भागातील एक तरुण कमी किमतीत दुचाकी विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. यातच सदर पथकाने दीपक सुपडू बैसाणे (रा.ताडेपुरा) याच्याकडे कागदपत्रे नसलेली दुचाकी आढळली. सखोल तपास केला असता ती दुचाकी गोकुळ गणेश भिल (रा.जिराळी, ता.पारोळा) याच्या मदतीने चोरी केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी संशयित भिल यालाही गावातून ताब्यात घेतले. दोघांची विचारपूस केली असता त्यांनी दशरथ भिका कोळी (रा.जैतपीर, ता.अमळनेर) याच्यामार्फत चार व गोपाळ संभाजी वानखेडे (रा.मंगरूळ, ता.अमळनेर) याच्यामार्फत तीन दुचाकी कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विक्री केल्याचे कबूल केले. संशयितांच्या ताब्यातून १३ दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.