बोंबला : नव्यानेच बांधलेल्या फरशी पुलावर फसले ट्रॅक्टर !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अगदी अलीकडेच पूर्ण करण्यात आलेल्या कळमसरे ते नीम गावांच्या दरम्यान असलेल्या फरशीची पहिल्याच पावसात दैनावस्था झाली असून परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

Image Credit Source: Live Trends News

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी कळमसरे-नीम या दरम्यान फरशी पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. पहिल्याच पावसात याची दैनावस्था झाल्याने या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

अवघ्या तीनच महिन्यात या फरशी पुलावरील डांबर पुर्णतः निघाले असून, पुलाच्या दोन्ही बाजूस टाकण्यात आलेले मातीमुळे साईटपट्टी खचण्यास सुरुवात झाली आहे.परिणामी अवजड तर जाऊ द्या; खाली वाहने देखील रस्त्याच्या दुतर्फा बाजूस फसत आहेत. दुसरी बाब म्हणजे पुलासाठी वाळू ऐवजी याठिकाणी कचचा वापर मोठ्या प्रमाणावर केला असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे आतापासूनच या पुलाच्या कठड्यांना काही ठिकाणी तडे गेल्याचे उघड झाले आहे.परिणामी याच पावसाळ्यात मोठा पाऊस होऊन पुलाला पुराचा तडाखा बसला तर हा फरशी पूल टिकेल याची शक्यता नाकारता येत नाही. यात प्राण व वित्तहानी होण्याचाही धोका आहेच.

काल या फरशी पुलाच्या सार्डडपट्टीवर एक ट्रॅक्टर चक्क रूतून पडले. अखेर जेसीबीच्या मदतीने त्याला काढण्यात आले. याप्रसंगी परिसरातील ग्रामस्थांनी पाहणी केली असता पुलासह रस्त्यावरील डांबराचा थर हा अगदी जराही उकरला असता बाहेर निघून येत असल्याचे दिसून आले. यामुळे सदर काम करणार्‍याच्या विरोधात अतिशय संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

एकीकडे शासन विकास कामांसाठी लाखो रुपये निधी खर्च करत असले तरी दुसरीकडे ठेकेदार असे निकृष्ट कामे करून आपले खिसे गरम करून जनतेच्या जीवाशी खेळतात.असाच काहीसा प्रकार या फरशी पुलाबाबत दिसून येत आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

Protected Content