अमळनेर-लाईव्ह ट्रेंड न्यूज प्रतिनिधी | गेल्या तब्बल दहा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अमळनेर पोलिसांनी मध्यप्रदेशातून शिताफीने अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर पोलीस स्थानकात मनोज देविदास पाटील (वय २३वर्षे रा. जुने बस स्थानक अमळनेर ) यांनी फिर्याद दिली होती. यानुसार आरोपी कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव रा. गांधलीपुरा याने नाचतांना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून फिर्यादीस मारहाण करत त्याच्या हातातील वस्ताराने गळ्यास कंठाजवळ व पायाच्या मांडीवर मारुन जखमी केले होते. यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी हा फरार होता. दरम्यान सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करुन मा. न्यायलयात आरोपीताविरुध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.सन २०१३ पासुन आतापावेतो फरार होता. मध्यंतरी न्यायालयाने त्याचे स्थायी वॉरंट देखील काढले होते. त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करून देखील तो आढळून आला नव्हता.
अमळनेर पोलीस स्थानकाचे निरिक्षक विजय शिंदे यांना कालु उर्फ विशाल दुर्गादास जाधव हा मध्यप्रदेशातील इंदूर येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी या अनुषंगाने पथक तयार केले. यात उपनिरिक्षक अनिल भुसारे व त्याचे सोबत चे पोना मिलींद भामरे , पोना. सुर्यकांत साळुंखे आदींचा समावेश होता. या पथकाला तो काल रात्री दिसून आला. पोलिसांना पाहून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याला शिताफीने अटक करण्यात आली आहे.