अमळनेरवरील पाणी टंचाईचे सावट झाले दूर !

अमळनेर प्रतिनिधी । येथील नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे वीज बील भरण्यात आल्यामुळे शहरवासियांवरील पाणी टंचाईचे सावट दूर झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, महावितरणने गुरुवारी जळोद येथील पंपगृहासह गांधली व अंबर्षी टेकडी येथील जलशुद्धीकरण केंद्रांचा विजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता. त्यामुळे पालिकेने तातडीने १ कोटी थकबाकीपैकी २४ लाखांचा भरणा केला होता. मात्र, तरीही विजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरणचे वरीष्ठ अधिकारी तयार नव्हते. त्यामुळे अमळनेर शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्याने आमदार अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विनंती केली होती.

यानंतर ना. गुलाबराव पाटील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी संपर्क साधला. पालिकेने १ कोटी थकबाकीपैकी किमान ५० लाखांचा भरणा करावा, अशी अट घालून ऊर्जामंत्र्यांनी विजपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेने २६ लाख ७० हजार रुपयांचा शुक्रवारी पुन्हा भरणा केला. त्यानंतर महावितरणने खंडित केलेला विजपुरवठा शुक्रवारी दुपारी पुन्हा सुरळीत करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी दिली.

अर्थात, यामुळे आता अमळनेरवरील पाणी टंचाईचे सावट दूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content