आ. अनिल पाटलांच्या प्रयत्नांनी ‘मुक्ताई मार्ट’ला मंजुरी !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने ‘मुक्ताई मार्ट’ ला मंजुरी मिळाली आहे.

ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू लागला आहे. विविध प्रकारच्या वस्तू ,नियमित लागणारे खाद्य पदार्थ, बनवून रास्त भावात विक्री केले जातात. मात्र महिलांनी बनवलेला माल विक्री करायला जागा नाही , आणि शहरातील महागड्या जागा ,शॉपिंग कॉम्प्लेक्स परवडणारे नाही. नेमकी ही समस्या लक्षात घेऊन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी एकाच ठिकाणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व बचत गटांसाठी बाजार पेठ उपलब्ध झाली तर महिलांना आपल्या मालाची विक्री करणे सुलभ जाईल. म्हणून ग्रामविकास विभागाच्या निधीतून १३ लाख ४६ हजार रुपये किमतीची मुक्ताई मार्ट’ संकल्पना अमलांत आणली.

या अनुषंगाने पंचायत समिती च्या सभापती बंगल्या शेजारी असलेल्या सभागृहात मुक्ताई मार्ट उभारले जाणार आहे. यामुळे तालुक्यातील बचत गटाच्या महिला आपला उत्पादित माल विक्रीसाठी एकाच ठिकाणी आणतील. ग्राहकांना देखील बसस्थानकाच्या शेजारीच एका ठिकाणी विविध वस्तू आणि खाद्य पदार्थ मिळणार असल्याने त्यांची देखील सोय होणार आहे. बाजाराच्या तुलनेत ग्राहकांना वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतील. यामुळे ग्रामीण महिलांची प्रगती होऊन आर्थिक स्तर उंचावणार आहे. आमदार अनिल पाटील यांनी मुक्ताई मार्ट साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महिलांनी आमदारांचे आभार मानले आहेत.

Protected Content