अमळनेर-गजानन पाटील | एकीकडे अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकार्यांबाबत नॉट रिचेबलची चर्चा रंगली असतांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल पाटील हे रिचेबल असून त्यांनी आपल्याला यातील काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह सात आमदार नॉट रिचेबल असल्याचे वृत्त दैनिक सकाळच्या ऑनलाईन आवृत्तीने दिले आहे. या वृत्तानुसार काल सायंकाळपासून अजित पवार आणि त्यांच्या सहकार्यांचे फोन लागत नाही. यामुळे ते नॉट रिचेबल असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आलेला आहे. तर आज सकाळ पर्यंत या संदर्भात कुणीही अधिकृतपणे भाष्य केले नव्हते.
दरम्यान, या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार तथा पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याशी सकाळी सव्वाआठ वाजता संपर्क साधला. यात त्यांनी आपली शस्त्रक्रिया झाली असल्याने आपण घरीच असल्याचे सांगितले. या प्रकरणाबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. कुणालाही वैयक्तीक कारणे असू शकतात. यामुळे या संदर्भातील प्रश्न हा निरर्थक असल्याची पुष्टीदेखील त्यांनी याप्रसंगी जोडली.
आमदार अनिल भाईदास पाटील हे अमळनेरातच असून कालच त्यांनी एस.टी. आगारातील संघर्षात कर्मचार्यांशी संवाद साधून चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती हे विशेष !