अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गांजा तस्करी प्रकरणातील फरार आरोपी विजय किसन मोहिते याला मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या वर्षी १२ जुलै रोजी अमळनेर पोलिसांनी गांजाचा मोठा साठा जप्त केला होता. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, एपीआय राकेशसिंग परदेशी, हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील, हेड कॉन्स्टेबल मिलिंद भामरे यांनी १२ जुलै २१ रोजी रात्री ९वाजता गस्त सुरु घालताना धरणगावकडून सावखेड्याकडे येणारा सतीश बापू चौधरी हा संशयित दुचाकीवरुन (एमएच- १९, ५७३०) टेहळणी करताना आढळला होता.
पोलिसांनी त्याला अडवले. त्यानंतर त्याच्या मागोमाग चालक आकाश रमेश इंगळे चालवत असलेल्या चारचाकी (एमएच- ०१, बीटी- ५०९)ला देखील पोलिसांनी अडवले. तपासणीत गाडीच्या डिक्कीत २० पाकिटात ३९ किलो ५०० ग्रॅम ६ लाखांचा गांजा आढळला होता. हा गांजा कासोदा येथील शकील खान अय्युबखॉं याच्या मालकीचा होता. त्याच्यासोबत एरंडोल येथील रहिवासी विजय किसन मोहिते याचा ही या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले होते. पोलिसांनी आकाश, शकील आणि सतीश यांना अटक केली होती. हे तिघेही आरोपी सध्या कारागृहात आहेत. परंतु, विजय मोहिते हा गेल्या ९ महिन्यांपासून फरार होता.
दरम्यान, पोलिस निरीक्षक हिरे यांना विजय किसन मोहिते हा मध्यप्रदेशातील इंदूर येथे असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार त्यांनी पथकाची निर्मिती करून विजय मोहिते याला बेड्या ठोकल्या आहेत.