अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त 18 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादिंचे संवर्धन करता यावे. तसेच याबाबतच्या वैशिष्टांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने सूचना दिल्या आहे. त्यानुसार 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत राबविण्यात येतो.

अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव/माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट, विद्यार्थी यांच्याकरीता विविध कार्यक्रम, भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धां, व्याख्यानमाला, चर्चासत्र, परिसंवाद इत्यादि कार्यक्रमांचेही आयोजन करुन या कार्यक्रमातील विजेत्यांना पारितोषिके देण्याबाबत सुचि करण्यात आले आहे.

त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात अल्पसंख्यांकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मेळावे, चर्चासत्रे, इत्यादिंद्वारे अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, असे अपर जिल्हादंडाधिकारी, वामन कदम यांनी कळविले आहे.

Protected Content