जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तात्काळ मोजणी करता येवून जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होणार आहे. बांधावरून भावकीचे आपापसात वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशीनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार असून शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव येथील नगरपालिका सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी रोव्हर मशीन वाटपा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर, उपअधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे, नगर भुमापन अधिकारी पी. एस.पाटील उपस्थित होते. जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी आणि भूमिअभिलेख कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर्षी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे पंधरा रोवर मशीन वाटप करण्यात आल्या. यासाठी १ कोटी ८० लक्ष निधीची जिल्हा नियोज मधून तरतूद करण्यात आली, तर मागील वर्षी १२ आधुनिक जमीन मोजणी यंत्रे भूमिअभिलेख कार्यालयास देण्यात आली आहेत. यासाठी १ कोटी २० लाख निधी खर्च केले गेला होता.
भूमिअभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व जमिनींच्या अभिलेख्यांचे जतन करण्यासह नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या जमिनींचे मापन करण्यात येते. यात हद्दी निश्चित केल्यानंतर बिनशेती, ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख तयार केले जातात. आजवर या सर्व प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरिक पद्धतीत पार पाडल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तर लागतेच पण अनेक ठिकाणी झाडी-झुडपी, डोंगरदऱ्या यामुळे जमीन मोजणीत मोठ्या अडचणी येत होत्या. रोवर यंत्रांमुळे जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होणार आहे.
रोव्हर मशीनमुळे तास किंवा काही मिनिटाच्या आत मोजणी काम करता येते. मागील वर्षांपासून आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन (DPDC) मार्फत हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून दिले आहेत. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते. अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. या मशिनच्या सहाय्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. रोवर मशीनमुळे तासांमध्ये किंवा काही मिनिटातच या मशीनद्वारे जमिनीची मोजणी करता येते.
प्रास्ताविकात जिल्हा भूमीअभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक एम.पी. मगर यांनी योजनेची माहिती विशद करून होणारे फायदे सविस्तरपणे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप अधीक्षक, एरंडोल बी. सी. अहिरे यांनी केले. तर आभार पी. एस.पाटील , नगर भुमापन अधिकारी यांनी मानले. या कार्यक्रमाला मनोज चव्हाण, रतिलाल शिरसाठ, नुपम मेढे, कृष्णा भट, संजय सोनार, रोहिदास चव्हाण, विजय पाटील, रवींद्र महाजन, सुरेश वाडे प्रशांत कोळेकर, गोपाळ पाटील रवींद्र कदम, जिल्ह्यातील अन्य कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.