अकोला वृत्तसंस्था । अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. विषप्राशन केल्यानंतर या शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. सर्व शेतकऱ्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुरलीधर राऊत (वय -42), शेलाड गाव, मदन हिवरकर (वय -32), आशिष हिवरकर कान्हेर-गवळी, अबरार अहेमद रोशन अहमेद, साजिद इकबाल शेख मेहमूद (वय -30) आणि मोहम्मद अफझल गुलाम नबी (31) दोन्ही बाळापूर गावातील आणि अर्चना भरत टकले (वय – 30), बाळापूर असे विष घेतलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षात त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला आहे. दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेती गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांचा सरकारसोबत संघर्ष सुरू आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर त्यांच्या कक्षात विष प्राशन केले.
हे सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांना भेटण्यासाठी आले होते. महामार्गासाठी त्यांच्या संपादित करण्यात आलेल्या शेतीचा मोबदला त्यांना लवकरात लवकर मिळावा अशी त्यांची मागणी होती. मात्र त्यांना अधिकाऱ्यांकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर किटकनाशक प्राशन केले. जेव्हा ही बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांना तात्काळ जिल्हा नागरी इस्पितळात दाखल केले. येथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.