मुंबई प्रतिनिधी । जयंत पाटील हे गटनेते असल्याचा राष्ट्रवादीचा प्रतिदावा असला तरी अजित पवार हेच खरे गटनेते असल्याचा दावा आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
विधानसभेच्या रेकॉर्डवर राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून जयंत पाटील यांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे अजित पवार यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नसल्याची माहिती समोर आली असतांना आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतांना हा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, जयंत पाटील हे आपले गटनेते असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे काल त्यांनी न्यायालयात हे सांगण्याचा प्रयत्न केला तरी याला न्यायालयाने मान्य केले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. तर अजित पवार यांनी दोन वेळा गटनेते म्हणून राज्यपालांना माहिती दिलेली आहे. तसेच याबाबतचा अधिकार विधानसभाध्यक्षांना असणार आहे. यामुळे तेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.