पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा लोकसभा निवडणूकीसाठी दुसरा उमेदवार निश्चित झाला आहे. शिवाजी आढळराव पाटील यांनी २६ मार्च रोजी आज शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यांची लढाई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्यासोबत होईल. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. अजित पवार पत्रकार परिषद घेऊन शिवाजी आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत.
शिवाजी आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा लोकसभेला गेले आहेत. मात्र २०१९ साली शरद पवार यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर त्यांचा विजय झाला होता. शिरूर हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र ही जागा शिवसेनेने महायूतीतून राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिली आहे. त्यामुळे यंदा राष्ट्रवादी पक्षात फूट झाल्याने अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे.