काका-पुतण्याची गुप्त भेट : शरद पवारांची मनधरणी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतांनाच आज पुण्यातील उद्योगपतीच्या घरी शरद पवार आणि अजितदादा यांनी गुप्तपणे भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

पुणे शहरातील सर्वात आलीशान भाग समजल्या जाणार्‍या कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी आज दुपारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शरद पवार यांची गुप्त भेट घेतली. अजितदादांनी आपल्या सोबत ताफा न घेता ते दुसर्‍याच्या गाडीतून येथे दाखल झाले. शरद पवार हे स्वत:च्याच वाहनाने येथे दाखल झाले. तर जयंत पाटील हे देखील दुसर्‍या चारचाकीतून येथे आले. यानंतर या तिन्ही मान्यवरांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

ही चर्चा आटोपून उपमुख्यमंत्री अजित पवार हे काळी काच लावलेल्या दुसर्‍याच वाहनातून मिडीयाला चकवा देत अतुल चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडले. तर यानंतर तेथून बाहेर पडलेल्या शरद पवार आणि जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

आज झालेल्या भेटीचा तपशील जगासमोर आला नसला तरी शरद पवार यांनी देखील सरकारमध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचा प्रस्ताव हा अजितदादांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या समोर मांडल्याचे समजते. या संदर्भात शरद पवार हे आज बोलले नसले तरी दोन दिवसात ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

आज चांदणी चौकातील उड्डाणपुणाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते. विशेष करून मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगली असतांना दुपारीच पवार काका व पुतण्याची भेट झाल्याने आता याबाबतच चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content