२४ फेब्रुवारीला राज्यात भाजपचे २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । वीज विभागाकडून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांवर करण्यात येत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ, २४ फेब्रवारी रोजी भाजपाकडून राज्यभरात २८७ ठिकाणी जेलभरो आंदोलन केलं जाणार आहे.

 

महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत एवढं तीव्र आंदोलन झालं नसेल, तेवढं तीव्र आंदोलन केलं जाणार आहे, अशी घोषणा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांची देखील उपस्थिती होती.

 

“महाराष्ट्रात वीज विभागाकडून संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची व घरगुती वीज तोडणे आणि ते देखील दमदाटी करून, पोलिसांच्या बळाचा वापर करून. महाराष्ट्रात यापूर्वी या पद्धतीने कधीही या मोगलशाही पद्धतीने कारभार केला गेला नाही, मात्र असं काम मागील आठ ते पंधरा दिवसांपासून वीज खात्याकडून सुरू झालं आहे.” असं यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

 

 

“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच वर्षे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये, ४५ लाख शेतकऱ्यांचे २८ हजार कोटी थकीत झाल्यावरही एकाही शेतकऱ्याच वीज कनेक्शन आम्ही कापलं नाही. पण या सरकराने शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापणं सुरू केलं आहे. आज पिकांना पाण्याची गरज असताना संपूर्ण राज्यात वीज तोडणी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या मोगलशाही कारभारामुळे शेतकरी आत्महत्याकडे वळतील अशी कृती महाराष्ट्र सरकारकडून सुरू आहे. राज्यातील तीन कोटी लोकांना अंधारात आणण्याचा सरकारकडून प्रयत्न होत आहे. या सरकारला आज आम्ही शेवटची विनंती करतो आहे ” असा इशआरा देखील बावनकुळे यावेळी दिला.

 

“वीजप्रश्नी ज्यांच्यावर अन्याय झाला आहे अशा शेतकरी व नागरिकांकडे आम्ही जाणार आहोत व २३ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या स्वाक्षरीनिशी निवदेनं घेणार आहोत. या राज्यात २४ फेब्रुवारी रोजी जेलभरो आंदोलन २८७ ठिकाणी होणार आहे. यासाठी सर्व आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत जेवढं तीव्र आंदोलन झालं नाही, तेवढं तीव्र आंदोलन हे होणार आहे. जेलभरो आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर हा असंतोष आम्ही मांडणार आहोत.” अशी माहिती देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.

Protected Content