शेतकरी पुत्राची भरारी : एमपीएससीत राज्यात पहिला क्रमांक !

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या राज्यसेवा परिक्षेच्या निकालात शेतकरीपुत्र विनायक पाटील याने सर्वप्रथम येण्याचा पराक्रम केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा(एमपीएससी)तर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी घेण्यात आली होती. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमपीएससीने जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये विनायक पाटील याने पहिला, धनंजय बांगर यांनी द्वितीय, तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. यादीमध्ये एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे.

पहिला क्रमांक मिळवलेला विनायक पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड येथील आहे. आई-वडील शेती करतात. राज्यसेवेचा त्यांचा हा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी निवड झाली होती. आता ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बाब लक्षणीय आहे. त्यांनी संख्याशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.

दरम्यान, परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणार्‍या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होणार आहे.

Protected Content