अमळनेर (प्रतिनिधी) जी.के.गुजर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगारामजी केशवराव गुजर तथा भाई गुजर जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त व महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अजित जाधव यांना ‘भाई गुजर देशसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
अजित जाधव हे प्रामुख्याने महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या विचार प्रसाराचे कृतीशील कार्य, भारतीय स्वातंत्र्य व हुतात्म्यांना अभिवादन, क्रांतिकार्य उजाळा, लेक वाचवा समाज घडवा, आबाल वृद्ध, विद्यार्थी व महिला करीता विविध उपक्रम राबवित असतात. सध्या ते सातारा प्रतिसरकार व आझाद हिंद सेना अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने महाराष्ट्रभर क्रांती अभियान उपक्रम राबवित आहेत.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांना शाल, गौरवचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, विधान परिषद सदस्य आमदार आनंदराव पाटील, युवनेते सत्यजितसिंह पाटणकर, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिक वारस या मान्यवरांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
अजित जाधव यांना देशसेवा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक, आरोग्य, पत्रकार, विविध क्षेत्रातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्नेही व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे.