पंतप्रधान मोदी गरीब विरोधी असल्यानेच आमच्या योजनेला विरोध : काँग्रेस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षांला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली. दरम्यान, नरेंद्र मोदी काही श्रीमंतांचे पैसे माफ करु शकतात पण गरिबांना ७२ हजार रुपये मिळालेले चालत नाही. नरेंद्र मोदी 10 लाखांचा सूट घालू शकतात आणि तो चार कोटींमध्ये विकू शकतात. मग गरिबांना 72 हजार रुपये देण्याला विरोध कशासाठी ? असा प्रश्न कॉंग्रेसने विचारला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत या घोषणेसंबंधी काही गोष्टी स्पष्ट करत टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना उत्तर देत नरेंद्र मोदी गरीब विरोधी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

 

महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्ष ७२ हजार रुपये जमा करणार अशी माहिती रणदीप सुरजेवाला यांनी दिली. शहर आणि गावांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. देशभरातील सर्व गरिबांना ही योजना लागू असणार आहे. गरिबी मिटवण्यासाठी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार गरिबांना मिळत असणाऱ्या पैशांचा विरोध का करत आहे ? असा सवाल विचारला. भाजपा नेहमीच गरिबांच्या विरोधात उभी राहिली आहे. मोदींनी पंतप्रधान होताच शेतकऱ्यांची कर्जमाफी चुकीचं असल्याचं सांगितलं. मोदींनी पंतप्रधान होताच आदिवसींचे अधिकार काढून घेतले अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली.

Add Comment

Protected Content