Home Cities अमळनेर लग्नाचा आनंद विरला! हळदीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या ‘त्या’ बुलेटस्वाराचा करुण अंत

लग्नाचा आनंद विरला! हळदीचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या ‘त्या’ बुलेटस्वाराचा करुण अंत


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे-शहापूर रस्त्यावर सुरू असलेल्या फरशी पुलाच्या कामामुळे एका २७ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. सुनील सीताराम शिंदे (रा. सोनगीर, जि. धुळे) असे मृत तरुणाचे नाव असून, काल रात्री ७ एप्रिल रोजी झालेल्या या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

सुनील आपल्या कुटुंबासह कळमसरे येथे एका लग्नासाठी आला होता. रात्री हळदीचा कार्यक्रम आटोपून तो बुलेटने घरी परतत असताना, रस्त्यात सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या खड्ड्याचा त्याला अंदाज आला नाही. परिणामी, त्याची बुलेट थेट खड्ड्यात कोसळली आणि खड्ड्यातील सिमेंट पाईपच्या कडेला अडकून सुनीलचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा अपघात रात्री घडला, मात्र सकाळी कर्मचारी कामावर आल्यावर ही घटना उघडकीस आली.

मारवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. दरम्यान, पुलाच्या कामाच्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा कठडे किंवा सूचना फलक नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा गंभीर आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. सुनीलच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, त्याच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound