Home Cities अमळनेर पाडळसरे ग्रामपंचायतीत अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान; आशाबाई पाटील व सुनीता भिल यांचा...

पाडळसरे ग्रामपंचायतीत अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान; आशाबाई पाटील व सुनीता भिल यांचा गौरव

0
7


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पाडळसरे ग्रामपंचायतीतर्फे दोन कर्तबगार महिलांचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आशाबाई वसंतराव पाटील आणि सुनीता अशोक भिल यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

पाडळसरे ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार ग्रामपंचायतीच्या मुख्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सरपंच तथा प्रशासक शुभांगी पाटील आणि ग्रामसेवक सुभाष भोई यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 501 रुपयांचा धनादेश देऊन दोन्ही महिलांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात चामुंडा माता शेतकरी गट आणि महिला बचत गटाच्या अध्यक्षा आशाबाई वसंतराव पाटील यांनी महिला बचत गट व शेतकरी महिला गट स्थापन करून विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण साध्य केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली. महिलांना एकत्र आणून त्यांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करण्यामध्ये त्यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

तर सुनीता अशोक भिल या आदिवासी महिलेने शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध सेवा संस्थांच्या माध्यमातून काम करत आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन केले. महिलांना शेतीत सक्षम बनवणे आणि नवे तंत्रज्ञान समजावून देणे या त्यांच्या कार्यामुळे त्यांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील, प्रगतिशील शेतकरी विकास पाटील, विकास सोसायटीचे सचिव रणछोड पाटील, माजी सरपंच सचिन पाटील, पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील, विश्वास कोळी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भूषण पाटील, माजी उपसरपंच प्रभाकर पाटील, भटू पाटील, हेमंत राठोड, भावना पाटील, कैलास कोळी, सामाजिक कार्यकर्ते सागर कोळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भागवत पाटील यांनी केले तर आभार माजी सरपंच सचिन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound