अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुयारी गटार खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्त्याचे तीनतेरा झाल्याने नागरिकांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दाखल घेत रस्ता दुरुस्तीच्या कामास तात्काळ सुरुवात झाली आहे.
शहरात भुयारी गटारीसाठी खोदकाम केलेल्या रस्त्यांसह विविध ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून खड्ड्यांमुळे रस्त्याचे तीनतेरा झाल्याने जेष्ठ नागरीक आणि विद्यार्थ्याना पायी चालणे अवघड झाले होते,याबाबत येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी सोमवार, दि. २७ जून रोजी न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिल्याने दोनच दिवसात रस्ता दुरुस्ती कामास सुरुवात झाली आहे.
या तक्रार अर्जात म्हटले होते की, “शहरात अंडरग्राउंड तथा भुयारी गटारीसाठी रस्त्यांवर खोदकाम मोठ्या प्रमाणात झालेले आहे; मात्र खोदकाम झालेल्या ठिकाणी अद्यापही खड्डे जैसे थे अवस्थेत असल्याने रस्त्याची वाट लागली आहे. याठिकाणी असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून नागरिक व विद्यार्थ्यांची पायी चालताना पडझड होत आहे. विशेष करून शहरातील मुख्य बाजार पेठ, भागवत रोड, खड्डाजीन परिसर या भागात नागरिकांचे पायी चालताना खूपच हाल होत आहे. या ठिकाणी संबधित एजन्सीने केलेले खड्डे वेळीच न बुजविल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असते. यामुळे पायी चालताना जेष्ठ नागरिकांना खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अबालवृद्ध यात नकळत पडून त्यांना दुखापत झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आता शाळा/कॉलेज सुरु झालेले असून पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत; तरी तात्काळ निर्णय घेऊन खोदकाम झालेल्या ठिकाणचे खड्डे बुजवावेत आणि सदर परिसरात साफसफाई व स्वच्छता करून शहरातील नागरिकांची सोय करावी अशी विनंती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना करण्यात आली होती.
याबाबत काहीच कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील भाजपा शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, सरचिटणीस राकेश पाटील,व्यापारी आघाडीचे बापू हिंदुजा,दिलीप ठाकूर,दिपक पवार, योगीराज चव्हाण, तुळशीराम हटकर, युवामोर्चा अध्यक्ष पंकज भोई, सरचिटणीस राहुल चौधरी, हिरालाल पाटील, दिपक महाजन आदींनी दिला होता.
या निवेदनाची दखल मुख्याधिकारी सरोदे यांनी घेत मजिप्र आणि संबधित एजन्सीला सूचना केल्याने भागवत रोडवर रुग्णसेवा हॉस्पिटल व कोंबडी बाजारकडे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली आहे,मात्र पावसाळा असल्याने केवळ देखावा न करता काम चांगल्या पद्धतीचे व्हावे आणि संपूर्ण शहरात यापद्धतीनेच दुरुस्तीची कामे व्हावीत. अशी मागणी भाजपाने करून मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान दि ३० जून रोजी सर्व भाजपा पदाधिकारी सुरू झालेल्या कामाची सामूहिक पाहणी करणार असल्याचे शहराध्यक्ष उमेश वाल्हे यांनी म्हटले आहे.