बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी कुऱ्हा हरदो, लोणवाडी, धोनखेडा येथे शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची, घरांची पाहणी केली. काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरील मोऱ्या बंद झाल्यामुळे, मोऱ्यांच्या अपूर्ण बांधकामामुळे पाणी शेतात शिरल्याने शेतांचे नुकसान झाले आहे. याबाबत ॲड.रोहिणी खडसे यांनी सार्व, बांधकाम विभागाचे अभियंता बेनकुळे यांच्या सोबत दुरध्वनी वरुन चर्चा केली असता त्यांनी एक महिन्याच्या आत मोऱ्यांचे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
बोदवड तालुका हा अवर्षणग्रस्त तालुका म्हणुन ओळखला जातो, परंतु तालुक्यातील कुऱ्हा हरदो, धोनखेडा, लोणवाडी परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या परिसरातील शेती शिवार, घरांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे यापूर्वी जुलै महिन्यात या परीसरात अशाचप्रकारे अतिवृष्टी होऊन शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते. काल रात्री या परीसरात झालेल्या ढग फुटी सदृश्य पाऊसाने परत मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतीचे बांध फुटले असून शेतात पाणी साचले आहे घरांमध्ये पाणी घुसल्याने घरातील सामान भिजले आहे.
तसेच ॲड. रोहिणी खडसे यांनी बोदवड तहसीलदार मयुर कलसे यांची तहसील कार्यालय बोदवड येथे भेट घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली तसेच जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावर शासनाकडे पाठपुरावा करण्या बाबत चर्चा केली. यावेळी ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या कुऱ्हा हरदो, धोनखेडा, लोणवाडी परीसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेती शिवाराचे, घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात अशाच प्रकारे झालेल्या पाऊसामुळे शेती शिवाराचे आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकरी बांधवांना कर्ज काढून दुबार पेरणी करावी लागली होती, त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. आता परत काल झालेल्या पाऊसामुळे शेती शिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत. ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतजमीन खरडून पिके वाहून गेले असुन शेतात पाणी साचले असल्याने जे पिके उभे आहेत ते सुद्धा पिवळे पडून त्यांच्या मुळा सडून खराब होतील अशी परिस्थिती उद्भवली आहे.
आधीच दुबार पेरणी मुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी बांधव कालच्या अतिवृष्टी सदृश्य पाऊसामुळे पुर्णपणे खचून गेला असून सरकारने शेतकरी बांधवांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे करणार असल्याचे सांगीतले. यावेळी बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, रामदास पाटील, विजय चौधरी, भागवत टिकारे, वामन ताठे,भरतअप्पा पाटील, प्रदिप बडगुजर, प्रफुल पाटील, शाम सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.