दुचाकीच्या धडकेत प्रौढ गंभीर जखमी; अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अनमोल शॉपी दुकानासमोर पायी जात असलेल्या ५४ वर्षीय प्रौढ व्यक्तीला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. उपचार घेतल्यानंतर रविवारी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू शामराव पांडव वय ५४ रा. अष्टविनायक नगर, अमळनेर हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता पायी घरी जात असतांना शहरातील अनमोल शॉपी दुकानासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत बाळू पांडव हे गंभीररित्या जखमी झाले. तर दुचाकीस्वार हा दुचाकी घेवून पसार झाला होता. जखमी झालेल्या बाळू पांडव यांना तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर रविवारी १० मार्च रोजी बाळू पांडव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीसात अज्ञात दुचाकीधारक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अशोक साळुंखे हे करीत आहे.

Protected Content