विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी (व्हिडीओ)

ellection press

जळगाव, प्रतिनिधी | भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली असुन जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात पुरुष मतदार १७ लाख ९६ हजार ३२६ तर स्त्री मतदार १६ लाख ५० हजार ७२९ व इतर ९३ असे एकूण ३४ लाख ४७ हजार १४८ मतदार आहेत. तसेच ११ विधानसभा मतदार संघात एकूण ७८४६ सैनिक मतदार आहेत. तर दिव्यांग मतदार एकूण १४८५२ आहेत. जिल्ह्यात एकूण ३५३२ मतदान केंद्रे असून सहाय्यकारी मतदान केंद्रांची संख्या ५४ आहे, असे एकूण ३५८६ मतदान केंद्र आहेत.

मतदानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ६५१३ मतदान यंत्र (बीयु) तर ४४४३० (सीयु) तर ४८८२ (व्हीव्हिपॅट) यंत्रे प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. २१ सप्टेंबरपासून निवडणूकीची आदर्श आचारसंहिता संपूर्ण जिल्ह्यात लागू झालेली असल्याने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार असून यासाठी आचारसंहिता पथके तयार करण्यात आली आहेत.

येत्या २७ सप्टेंबर (शुक्रवार ) रोजी निवडणूक अधिसूचना जारी करण्यात येणार असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर (शुक्रवार) आहे. ५ ऑक्टोबर (शनिवार) रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर ७ ऑक्टोबरपर्यंत (सोमवार) उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. २१ ऑक्टोबर (सोमवार) रोजी मतदान तर, २४ ऑक्टोबर (गुरुवारी) रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पुर्ण होण्याचा दि.२७ ऑक्टोबर (रविवार)असल्याचेही डॉ.ढाकणे यांनी सांगितले.यासाठी संपूर्ण प्रक्रीयेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध कक्ष प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

१९५० या टोल-फ्री दूरध्वनी क्रमांकावर मतदारांना निवडणुकीविषयी माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ साठी SUVIDHA , C-Vigil, SUGAM या IT Application वापर करण्यात येणार आहे. निवडणुक कामकाजासाठी आवश्यक असलेले मनुष्य बळ पुरेसे उपलब्ध असून त्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे.जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी सहकार्य करण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येण्यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा सक्रीय करण्यात आली असून पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक कार्यवाही हाती घेतली असल्याची माहिती यावेळी जिल्हा पेालीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. गुन्हेगारांना पाठबळ देण्याऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, तहसिलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसिलदार आंनद कळसकर हे उपस्थित होते.

 

 

Protected Content