जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेसमोर भरणारा ‘संडे बाजार’ आणि फुले मार्केट परिसरातील वाढते अतिक्रमण या मुद्द्यावरून आज झालेली महासभेत चर्चा करण्यात आली. महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचत सभागृह नेते नितीन लढ्ढा यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले.
महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर दिपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत ही महासभा पार पडली. सभेचे कामकाज सुरू होताच नितीन लढ्ढा यांनी शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला. विशेषतः दर रविवारी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भरणाऱ्या संडे बाजारामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी कोंडी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

रुग्णवाहिका आणि अंत्ययात्रांना अडथळा :
लढ्ढा यांनी आक्रमक पवित्रा घेत सांगितले की, “महापालिका समोरील रस्त्यावर रविवारी पाय ठेवायला जागा उरत नाही. याच रस्त्यावरून गंभीर रुग्णांना नेणाऱ्या रुग्णवाहिका आणि अंत्यसंस्कारासाठी जाणारी वाहने जात असतात. अतिक्रमणामुळे या वाहने जाण्यासाठी अडचणीचे ठरत आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असून, या उच्चभ्रू भागातील रहिवाशांना संडे बाजारामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.”
जैन मंदिर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा
संडे बाजारसोबतच फुले मार्केट समोरील जैन मंदिर परिसरात असलेल्या अतिक्रमणाबाबतही त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. धार्मिक स्थळांच्या परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांमुळे भाविकांना आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
फेरीवाल्यांसाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी :
प्रशासनाने केवळ अतिक्रमण हटाव मोहीम न राबवता, या फेरीवाल्यांसाठी तातडीने दुसरी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. “फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा, मात्र मुख्य रस्ते आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करा,” असे निर्देश यावेळी देण्यात आले. यावर आयुक्त आणि महापौरांनी संबंधित विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आणि नियोजित फेरीवाला क्षेत्राचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सभेला विविध प्रभागांचे नगरसेवक आणि मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



