जळगाव प्रतिनिधी | “करुणामयी सेवेचा परीसस्पर्श असलेले ज्ञानदान हे सर्वार्थाने क्रांतीज्योती सावित्रीमातेचे सृजनशील प्रतिभा पूजन होय” असे भावोद्गार साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांनी केले. डॉ.कलाम पुस्तक भिशी व देवकाई प्रतिष्ठानच्या वतीनं ‘आदर्श समाजशिक्षिका पुरस्कार’ वितरण प्रसंगी ते बोलत होते.
जिजाऊ जयंतीदिनी सोमवार दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी ‘जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव व देवकाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श समाजशिक्षिका पुरस्कार २०२१/२२ बालविश्व प्राथमिक शाळा व बालविश्व इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका भारती चौधरी यांना देण्यात आला .
पुरस्कारात प्रेरणादायी सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक प्रल्हाद चौधरी, कुमुदिनी चौधरी, सदगुरु भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविश्व शाळेचे अध्यक्ष संदीप चौधरी, पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हा प्रमुख विजय लुल्हे, देवकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कलाशिक्षक सुनील दाभाडे, आर.आर.शाळेचे शिक्षक बापू पानपाटील, बालविश्व शाळेचे मुख्याध्यापक फरमान तडवी, उपशिक्षक आशिष पाटील, उपशिक्षिका पल्लवी घारे, विवेकिनी पाटील, स्वाती सपकाळे आदींची उपस्थिती होती.
सद्गुरु भक्तराज कांदळीकर यांच्या विचारांचे फोल्डर टेबल कॅलेंडर संचालिका भारती चौधरी यांनी हिंगोणेकरांसह सर्व अतिथिंना देऊन स्वागत केले. प्रस्तावनेत विजय लुल्हे यांनी पुस्तक भिशीची संकल्पना, कार्यवाही व राबवित असलेल्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतीक व वाड़मयीन उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी शशिकांत हिंगोणेकर यांनी महाराष्ट्रातील नामवंत सेवाभावी शिक्षण संस्थांचा परिचय देऊन शालेय गुणवत्ता वाढविण्यासाठी व प्रशासकीय मदतनिधी मिळविण्या संदर्भात मार्गदर्शन केले.
सत्काराला उत्तर देतांना मुख्याध्यापिका भारती चौधरी यांनी अंध, अपंग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवाहात आणण्यासाठीचे विशेष प्रयत्न सांगितले. जन्मतः अपंग पाल्यांची सेवा करणाऱ्या जन्मदात्यांपुढे मी सदैव नतमस्तक होते असे त्यांनी भावोत्कटतेने सोदाहरण सांगितले. संस्थाध्यक्ष संदिप चौधरी यांनी दोन्ही मेडियमच्या शाळेची वर्गसजावट दाखवून अंध अपंगांसाठी राबवित असलेल्या स्पिच थेरपी, फिजिओथेरपीचे प्रयत्न सांगून ब्रेल लिपी प्रशिक्षण व मानसोपचारा संदर्भात उपक्रमांची माहिती दिली. आभार प्रदर्शन पल्लवी घारे यांनी केले.