मुंबई प्रतिनिधी । भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील दुसऱ्या क्रमाकांवर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी समूहाने तब्बल १० हजार कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शवली आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्येच अदानी समूहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. सध्या एमआयएएलचे १३.५ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. तसेच भविष्यात आपल्या मालकी वाढवण्यासाठी समूहाने १० हजार कोटींची तरतूद करुन ठेवली आहे. मात्र सध्या विमानतळाचा कारभार पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीने अदानी समूहाच्या या हिस्सेदारीला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. मूळची दक्षिण आफ्रिकेची असणाऱ्या जीव्ही ग्रुपकडे सध्या एमआयएएलचे ५०.५० टक्के हिस्सेदारी आहे. त्याशिवाय बिडवेस्टकडे १३.५ टक्के आणि एसीएसए ग्लोबल लिमीटेडकडे १० टक्के हिस्सेदारी आहे. मागील १३ वर्षांपासून या कंपन्या एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कारभार हाताळत आहेत.
बिझनेस स्टॅण्डर्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्यवहारासाठी अदानी समूह १० हजार कोटी गुंतवण्यास तयार असून ते कायदेशीर निकालाची वाट पाहत आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. बिडवेस्टने त्यांच्या मालकीची सर्व हिस्सेदारीचे हक्क अदानी समूहाला विकण्याची तयारी दर्शवली आहे. विमानतळाची किंमत आठ हजार कोटी गृहित धरुन बिडवेस्टने ७७ रुपये प्रती समभाग या दराने सर्व हक्क एक हजार २४८ कोटींना विकण्याची तयारी दर्शवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिडवेस्टने आधी आपल्या मालकीचा हिस्सा जीव्हीके समूहाला विकण्याचे ठरवले होते. मात्र नियोजित वेळेत जीव्हीकेला व्यवहार पूर्ण करता आला नाही. त्यामुळे हे प्रकरण अदानी समूहाने हे प्रकरणात राष्ट्रीय लवादाला लक्ष घालण्याची विनंती केली. लवादाने जीव्हीके समूहाला ३० सप्टेंबरपर्यंत व्यवहार पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यानंतर व्यवहार पूर्ण करण्याचा कालवाधी ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.