विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील परवानाधारक रिक्षा चालकांना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. विना मीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिला आहे.

 

एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असून ही बाब कायदेशीर आहे. 1 नोव्हेंबर, 2021 रोजी झालेल्या लोकशाही दिनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक हे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर न बसविता अवाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली आहे. जळगाव शहरातील सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांना आवाहन करण्यात येते की, सर्व ऑटोरिक्षा परवाना धारकांनी लवकरात लवकर आपल्या रिक्षांना फेअर मीटरप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी. असे न झाल्यास संबंधित ऑटोरिक्षा परवाना धारकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

यासाठी ९ नोव्हेंबर पासून शहरात शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशीक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त पथकाद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ९८ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आले आहे. ही कारवाई पुढे देखील सुरू राहणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

Protected Content